मुंबई: पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा. आर्मीतील जवानांसारखा फिटनेस ठेवा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. पोलिसांच्या 112 हेल्पलाईन आणि सीसीपीडब्ल्यूसी प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री साहेब बघा कसे सडपातळ आहेत. आम्हाला पोलिसांची सुटलेली पोटं कमी करायची आहेत. मी लहानपणापासून पोलिसांना बघत आलोय. पोलिसांचा धाक आणि दरारा वाटला पाहिजे. पोलीस पहिलवान नको, पण पोलीसच वाटला पाहिजे. पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा. आर्मीतील जवानांसारखा फिटनेस ठेवा.
महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच पोलिसांना विश्वास दिला आहे. कोविड काळात सक्षमपणे पोलीसांनी काम केलं आहे. डायल 112 साठी वाहन कमी पडतात यासाठी जिल्हा नियोजनमधील निधी दिला जाईल. पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे तो मार्गी लावायचा आहे. मागील सरकारच्या काळात हा निर्णय घेतला होता. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी एवढा वेळ का लागतो याची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मात्र तुमच्या विश्वासााला डाग लागता कामा नये, असं अजित पवार म्हणाले.