जळगाव :- शहरातील एसएमआयटी महाविद्यालय ते बजरंग बोगदा दरम्यान रस्त्यालगत असलेल्या नाल्यावरील अतिक्रमणावर अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली. परंतु नागरिकांनी कारवाईला विरोध करत महापौर व आयुक्तांची महापालिकेत येवून भेट घेतली व बांधकाम न पाडण्याची विनंती केली. दरम्यान, 20 मीटरचे अतिक्रमण काढावे व नाल्याचा उतार लक्षात घेता हा भाग परत बांधावा.त्यानंतर पुढचे अतिक्रमण काढावे, असे ठरल्यानुसार हे अतिक्रमण निघणार, असे आयुक्तांनी ठरविल्याप्रमाणे अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बजरंग बोगदा ते एसएमआयटी कॉलेज रोडवरील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या कामाला मंजुरी मिळून सहा महिने उलटले असून चार महिन्यांपूर्वी नगररचना विभागाने अतिक्रमणात असलेल्या भागाचे सीमांकन केले होते. रहिवाशांना नोटीस दिल्यानंतर नागरिकांनी स्वत: काहीही हालचाली न केल्याने पालिकेने आता कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे.













