मुंबई: बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा पुर्नउच्चारही राऊतांनी यावेळी केला आहे.
किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी गैरव्यवाहर केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी त्यांची इतकी पळापळ का सुरु आहे. कोणत्या गुन्ह्याखाली त्यांना अटक होणार, याची स्पष्टताच नाही. मग अटकपूर्व जामिनासाठी ते धावाधाव का करत आहेत, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच आगामी काळात बाप-बेटे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणारे भाजपचे नेते निश्चितच तुरुंगात जातील. माझे हे शब्द लक्षात ठेवा, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मी या सगळ्या गोष्टींचा खुलासा करेन. तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून अपहरण आणि खंडणीसारखे गुन्हे घडले आहेत. केंद्रीय तपासयंत्रणांच्या अधिकाऱ्यांना आमचं राज्य आहे, असं वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्र पोलिसांनाही कारवाई करण्याचा अधिकार आहे. हे मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे. आगामी काळात महाराष्ट्र पोलीस अपहरण आणि खंडणीच्या आरोपाखाली कारवाई करू शकतात, असे संकेत संजय राऊत यांनी दिले.