जळगाव प्रतिनिधी । शहरातील ममुराबाद रोडवर एका तरूणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) रा. उस्मानियॉ पार्क असे मयत तरूणाचे नाव असून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेख गफ्फार हे बांधकामाचे सेंटींग काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आईवडील, पत्नी, भाऊ व दोन मुलांसह शहरातील उस्मानिया पार्क येथे वास्तव्याला आहे. बुधवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी काम आटोपून घरी निघाले होते. परंतू ते रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता कोठेही आढळून आले नाही. गुरूवारी २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील कोंबडी फार्मजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला.
त्यांच्या डोक्यावर, हनुवटीवर मार लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. जळगाव तालुका पोलीस आणि नातेवाईकांनी धाव घेतली व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईक व मित्र परिवार यांनी मोठी गर्दी केली होती. तरूणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशयित नातेवाईकांकडून केले जात आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी पुढील चौकशी करत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.