- राज्यात युती मात्र स्थानिक पातळयांवर बिघाड
- विद्यमान आमदारां विषयी मित्र पक्षात प्रचंड नाराजीचा सूर
- काही ठिकाणी मातब्बरांना धोबी पछाड देण्यासाठी नेते मंडळींचे पाठबळ
जळगाव, (प्रवीण सपकाळे) – विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला असून इच्छुक उमेदवारांना आता अधिकृत पक्षाच्या उमेदवारीची प्रतिक्षा आहे. जर आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही तर बंड पुकारून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, पाचोरा, धरणगाव, अमळनेर, रावेर, भुसावळ, पारोळा, जळगाव, चाळीसगाव या ठिकाणी इच्छुकांनी रणनीती आखून मतदारांशी जनसंपर्क करण्यास सुरूवात केली आहे. सर्वाधिक बंडखोरी ही भाजप-व सेना पक्षात होण्याची चिन्ह दिसत आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवाराला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील अशी चर्चा निष्ठावान कार्यकर्त्यांत होत आहे. दिवाळीपूर्वी आपल्याच पक्षाचे सरकार स्थापन होईल असे युतीचे नेते मंडळी सांगत आहे. त्यामुळे युतीच्या मतदार संघात उमेदवारी मिळावी यासाठी दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी करून नेते मंडळींकडे आग्रह लावून धरला आहे. ही निवडणूक ही सर्वाधिक चुरशीची ठरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय जाणकारांत व्यक्त होत आहे.
जळगाव शहर मतदार संघातून भाजपाचे विद्यमान आ.राजूमामा भोळे यांची उमेदवारी जवळ जवळ निश्चित मानली जात आहे. मात्र शिवसेनेचे माजी महापौर डॉ. सुनील महाजन यांनी बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. तशीच परिस्थिती पाचोरा – भडगाव मतदार संघात निर्माण झाली असून सेनेचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या विरोधात भाजपाचे युवा नेते अमोल शिंदे यांनी कालच भाजपाचा मेळावा घेऊन उमेदवारी करणार असल्याचे संकेत देऊन बंडखोरीची तयारी दर्शवली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेनेचे उपनेते तथा ना. गुलाबराव पाटलांच्या विरूध्द जळगाव कृउबा समितीचे माजी सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी आण्णा टेलर यांनी पाळधीतच भाजपाचा मेळावा लावून बंडखोरी करून निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट केले आहे.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजप – सेनेची युती ही माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यामुळे तुटल्याची भावना सेनेच्या कार्यकर्त्यांत होती. त्यामुळे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून राजकीय पाठबळ दिले होते. तरी देखील आ. खडसे यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर सर्वांना मात देऊन विजय मिळविला होता. परंतु आता होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा आ. खडसे हे निवडणूक लढविणार असून त्यांच्या विरूध्द पुन्हा सेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील हे बंडखोरी करून निवडणूक लढविणार असल्याचे समजते. राज्यात वरिष्ठ नेते मंडळीनी युती झाली असल्याचे सांगत आहेत. परंतु जळगाव जिल्ह्यात युतीच्या उमेदवारा विरूध्द मित्र पक्षाचे मंडळी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने अधिकृत उमेदवारांची चांगलीच डोके दुखी वाढणार आहे.
राज्यात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला असून अद्याप एकाही राजकीय पक्षाने त्यांच्या उमेदवारांचीं नावे जाहीर न केल्याने इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्याना उमेदवारीची उत्कुंठा लागून आहे. राष्ट्रवादी काँंग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आघाडी करून काही उमेदवारांच्या नावाची यादी तयार केली आहे. तर भाजप-सेना युती देखील झाली असल्याचे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सांगत आहे. लवकरच युतीची घोषणा होऊन उमेदवारांची नावे जाहीर होणार आहे. काही महिन्यांपासून विरोधी पक्षातील मातब्बर नेते मंडळीनी भाजप व शिवसेनेत मोठया प्रमाणात प्रवेश केल्याने दोन्ही पक्षाची ताकद वाढली आहे. राज्यात युती करून निवडणूक लढविण्यास नेते मंडळी उत्सुक आहेत, मात्र बहुतांश ठिकाणी स्थानिक नेते व कार्यकर्ते हे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा आग्रह करीत आहेत. जरी युती झाली तरी ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार असेल त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.