मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास भाजपला किमान 160 जागा मिळतील अशाप्रकारच्या जनमत चाचण्या असल्या तरीही शिवसेनसोबतची युती न तोडता त्यांना सोबत घेण्याचा निर्णय गुरुवारी दिल्लीतील भाजप नेत्यांच्या बैठकीत झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते. शिवसेनेला मित्रपक्षांसह देण्यात येणार्या जागा 129पेक्षा अधिक नसाव्यात, मात्र यातील काही जागांची अदलाबदल करण्याची शिवसेनेची मागणी मान्य करीत त्यांच्यासोबतची युती कायम ठेवण्यात येणार असल्याचेही समजते.
शिवसेना भाजय युतीतील जागावाटपाचा तिढा सुटत नसतानाच गुरुवारी मुख्यमंत्री दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशीही बैठक झाली. या बैठकीत राज्यातील जागावाटपाविषयी चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष यांच्यासाठी जागावाटपाचे नेमके सूत्र काय असावे याविषयी सांगोपांग चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मित्रपक्षांसाठी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी नऊ अशा 18 जागा सोडावयाच्या असून दोन्ही पक्षांच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यात या 18 जागांचाही समावेश असणार आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला 120 आणि मित्रपक्षांसाठी 9 अशा एकूण 129 जागा तर भाजपला मित्रपक्षांसह 159 जागा अशाप्रकारचे सूत्र या बैठकीत ठरविण्यात आल्याचे कळते. शिवसेनेच्या राज्यातील नेतृत्वाशी चर्चा करूनच हे सूत्र अंतिम करण्यात येणार असल्याचेही समजते.
मित्रपक्षांसाठी भाजपकडून कमळ – भाजप त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. दोन चार जागा सोडल्या तर उमेदवारी मित्रपक्षांची,चिन्ह मात्र भाजपचे अशा प्रकारची तयारी भाजपने सुरू केली आहे. शिवसेनेला 120पेक्षा जास्त जागा देण्यासाठी भाजप दिल्लीतील नेते उत्सुक नाहीत. अशावेळी शिवसेनेच्या 120 जागा सोडून त्यांना मित्रपक्षांसाठी ज्या जागा देण्यात येणार आहेत, त्या नऊ जागांवरील काही जागा धनुष्यबाणावर लढविण्याचा आग्रह शिवसेनेने धरल्यास भाजपकडून त्यासाठी होकार दिला जाऊ शकतो, असेही भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या 120 जागांचा आकडा आणखी काही वाढू शकतो. मात्र त्यासाठी त्यांना संबंधित मित्रपक्षांना विश्वासात घ्यावे लागणार आहे.