भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नारायण नगर, हनुमार मंदीरामागे पत्नीने दारूड्या पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी ही घटना घडली असलीतरी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकस्मात मृत्यूच्या अहवालाची बारकाईने तपासणी केल्यानंतर मयताची आत्महत्या नसून खून असल्याचा निष्कर्ष लावला. याप्रकरणी पत्नीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक केली आहे.
सविस्तर असे की, गणेश प्रभाकर महाजन (वय-५०, रा. लक्ष्मी नारायण नगर, हनुमार मंदीरामागे, भुसावळ) आणि सीमा गणेश महाजन (वय-४६) हे भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरात वास्तव्याला होते. गणेश महाजन याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे दररोज दारू पिऊन घरी आल्यावर पत्नीशी वाद घालणे व मारहाण करणे हे नित्याचेच झाले होते.गणेश महाजन हा दारू पिऊन घरी आला होता. यात दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू होते. गणेश महाजन दारू पिऊन आल्यानंतर पत्नी सीमा हिने त्याला दोन दिवस जेवण दिले नाही. त्यानंतर रोजच्या भांडणाला कंटाळून ४ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास रोजप्रमाणे गणेश दारू पिऊन घरी आला होत. त्यानंतर सीमा व गणेश यांचे भांडण सुरू झाले.
यात संतापाच्या भरात सीमा महाजन हिने नायलॉनची दोरी गणेशच्या गळ्यात आवळून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करून त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली होती. दरम्यान अपमृत्यू झाल्याची चौकशीमध्ये वैद्यकीय अधिकारी यांया अभिप्राय व आरोपी व साक्षिदार यांच्या चौकशीवरून ही आत्महत्या नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदेश निकम यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सीमा गणेश महाजन हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्ष दिलीप भागवत करीत आहे.
















