यावल : मुलीने प्रेमात धोका दिला म्हणून एका २७ वर्षीय तरुणाने ‘प्रेमभंग झाल्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना तालुक्यातील किनगाव येथे घडलीय. आत्महत्यापूर्वी त्याने भिंतीवर सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. समाधान राजू महाजन असे मृताचे नाव आहे.
किनगाव बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राजू महाजन कुटुंबासह राहतात. बुधवारी ते व पत्नी, लहान मुलगा, सून (लहान मुलाची पत्नी) असे सर्व जण शेतात कामाला गेले होते. त्यांचा अविवाहित मोठा मुलगा समाधान राजू महाजन (वय २७) हा घरी एकटा होता. महाजन कुटुंबीय सायंकाळी साडेपाच वाजेला शेतातून घरी परतले. यावेळी समाधान हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार पाहून कुटुंबीय प्रचंड हादरले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
यानंतर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी समाधान याने भिंतीवर प्रेमभंग झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले आढळून आले. योगेश महाजन याच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास सहायक फौजदार अजिज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करत आहे. शवविच्छेदनानंतर गुरुवारी सकाळी १० वाजता किनगाव येथे अंत्यसंस्कार होतील.
त्या मुलीने संबंध तोडले
समाधानने आत्महत्येपूर्वी भिंतीवर आपले एका मुलीवर सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिने धोका देऊन दुसर्याशी संबंध ठेवले. तिने संबंध तोडल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते.
















