नवी दिल्ली: तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस जनरल बिपिन रावत हे देखील या हेलिकॉप्टरमध्ये होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस बिपिन रावत यांच्या घरी पोहोचले. येथे ते सुमारे 10 मिनिटे थांबले.
संरक्षण मंत्री उद्या संसदेत निवेदन देणारजनरल रावत यांच्या प्रकृतीबाबत तातडीने कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले. IAF चे Mi-17VH हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई दलाच्या तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. या अपघाताची संपूर्ण माहिती संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असून, उद्या (गुरुवारी) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत या अपघाताबाबत निवेदन देणार आहेत.
सर्व जखमींना वाचवण्यात आले
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील सर्व जखमींना अपघातस्थळावरून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की सीडीएस जनरल रावत वेलिंग्टनमधील ‘डिफेन्स सर्व्हिसेस कॉलेज’ (डीएससी) मध्ये जात असताना हेलिकॉप्टर क्रॅश झाले. दरम्यान, कोईम्बतूरमधील अधिकृत सूत्रांनी सांगितले की, पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ढिगाऱ्यातून तीन जणांना बाहेर काढण्यात आले आहे. निलगिरी जिल्ह्यातील डोंगराळ भागात कुन्नूरजवळील नांजप्पानाचाथिरम भागात हेलिकॉप्टर कोसळले, असे त्यांनी सांगितले.