मुंबई | आफ्रिकन देशांमध्ये वेगाने पसरत असलेल्या करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेत सर्वच राज्यांना सतर्क केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला नाही, त्यामुळे लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हंटल की, देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही
शाळा 1 डिसेंबरलाच सुरू होणार-
दरम्यान, राज्यातील शाळाही 1 डिसेंबर पासूनच सुरू होणार असून त्यात कोणताही बदल होणार नाही असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. परंतु त्याचवेळी काही मार्गदर्शन नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत राज्यातील शाळा सुरू होतील.