जळगाव प्रतिनिधी | राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारल्यापासून प्रथमच जळगाव बस स्थानकातून बस बाहेर पडली. आज 27 रोजी दुपारी दोन वाजता जामनेर जळगाव ही बस पोलीस बंदोबस्तात 13 प्रवाशांना घेऊन पोहोचली. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत आगारप्रमुख धनराळे यांना घेराव घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभरात संप पुकारला आहे. मात्र, शासन स्तरावर कोणताही निर्णय झाला नसून, दुसरीकडे राज्य शासन सेवासमाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात व तालुक्यामध्ये एसटी बस सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
या अनुषंगाने दिनांक 27 रोजी दुपारी दोन वाजता जामनेर जळगाव ही बस जामनेरकडे येत असताना नेरी येथून एसटी बसला पोलीस बंदोबस्तात जामनेर आगारात आणण्यात आले या वेळी बसमध्ये 13 प्रवासी होते. एसटी बस जामनेरात येताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. आगारप्रमुख यांना घेराव घालत आमच्यासमोर एसटी बस आणून आमच्या भावनेशी खेळू नका अन्यथा याचा परिणाम मोठा होईल असा इशारा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.