जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील के.सी.पार्कजवळ ट्रॅक्टरची चारचाकी वाहनाला जोरदार धडक लागल्याने भीषण अपघात झाला असून चारचाकी वाहनातील २ जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक २५ नोव्हेंबर, गुरुवार रोजी सकाळी घडली.
दरम्यान या भीषण अपघातात एक महिला व एक पुरुष जखमी देखील झाले असून दोघांना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सविस्तर असे की, आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास भादली येथील पाटील कुटुंबीय चारचाकीने भोकर येथे जात होते. यावेळी कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क जकात नाक्याजवळ समोरून भरधाव वेगात येत असलेल्या लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. अपघातात चारचाकीचा पुढील भाग चक्काचूर झाला असून चालकासह एक महिला जागीच ठार झाली आहे. तसेच एक महिला व एक पुरुष दोघे जखमी झाले असून त्यांना लागलीच उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.