यावल : तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथील ३६ वर्षीय तरुणाचा मृतदेह भालशिवजवळ तापी नदीच्या काठावर आढळून आल्याने खळबळ उडाली. याेगेश देवराम शंकाेपाळ (वय ३६) असे मृताचे नाव आहे.
योगेश शंकोपाळ हा शेळगाव बॅरेजवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गुरुवारी सकाळी साडेसात वाजेला तो कामावर निघाला. नियमित तो तापी नदीच्या काठी दुचाकी लावून नदीतून पोहत शेळगाव कडील काठावर जावून कामावर जायचा. मात्र गुरुवारी सकाळी तो एका हातात कपडे घेऊन नदीतून पोहत निघाला आणि बेपत्ता झाला. सायंकाळी तो घरी परतला नाही म्हणून सर्वत्र शाेधूनही त्याचा तपास लागला नाही. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मात्र त्याचा मृतदेह तापी नदीच्या पात्रात आढळला. या प्रकरणी येथील पोलिसांत संजय शंकोपाळ यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अवघ्या चार महिन्यात नियतीचा खेळ
योगेश शंकोपाळ व सपना शंकोपाळ यांचा चार महिन्यांपूर्वी तीन अपत्यांसह सुखाचा संसार सुरू होता. त्यात अचानक १० जुलै रोजी योगेशची पत्नी सपना ही मोठी मुलगी वैष्णवी शंकोपाळ (वय ११) हिला घेऊन बेपत्ता झाली. शोध घेतला असता तिने शहापूर येथील तरुणासोबत प्रेम विवाह केल्याचे समोर आले. मुलगा भावेश व मुलगी किर्तीका यांचा सांभाळ करण्यासाठी नातेवाइकांच्या आग्रहामुळे गेल्या महिन्यात योगेश याने लक्ष्मीसोबत पुनर्विवाह केला हाेता.