नवी दिल्ली: देशभरात इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. दरम्यान, आज पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 35 पैशांनी महागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वर जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनित तेलाचा दर कमी होऊनही भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. त्यामुळे पेट्रोलने 121 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलने 112 रुपये प्रतिलीटरचा टप्पा ओलांडला आहे. राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये आज पेट्रोल 121.25 रुपये आणि डिझेल 112.15 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये प्रति लीटर आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 35 आणि 36 पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.79 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 105.80 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 108.99आणि 97.72 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.