जळगाव प्रतिनिधी | मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतल्यानंतरही अधून-मधून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. येत्या २ नाेव्हेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील चार दिवसात शेतीची अपूर्ण कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
गेल्याच पंधरवड्यात अवकाळी पावसाने खरिपाच्या उर्वरित उत्पन्नावरही पाणी फेरले हाेते.काही ठिकाणी शेतकरी सध्या जनावरांचा चारा जमवत आहेत. साेयाबीन, ज्वारी आणि मका काढणी सुरू आहेत. तर पावसाने अलीकडेच उघडीप दिल्याने कापूस वेचणी सुरू आहे. अशातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
येत्या २ नाेव्हेंबरपासून राज्यात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस मुसळधार स्वरूपात पडेल. पुढील पाच दिवस या पावसाचा मुक्काम असू शकताे. दिवाळीचा संपूर्ण आठवडाच पावसात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या चार दिवसांत शेतीची कामे तत्काळ पूर्ण करावी लागतील.