नशिराबाद प्रतिनिधी | ‘आई -बाबा मला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद येथे रविवारी रात्री घडली. कल्याणी लक्ष्मण मेश्राम (वय २३) असे मृत तरुणीचे नाव आहे.
साकेगाव येथील डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात नर्सिंगचे ट्रेनिंग ती घेत हाेती. तिची नशिराबादच्या मुक्तेश्वर नगरात वर्धा येथे राहत होती. रविवार रात्री नऊ वाजेपूर्वी तिने गळफास घेतला. ‘आई -बाबा मला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी तिने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली आहे.
ही बाब घर मालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी तत्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर कल्याणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे समाेर आले.