मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. देशभरात आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आज पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.13 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.47आणि 94.27रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अवघ्या 13 दिवसांत पेट्रोल-डिझेलची सुस्साट दरवाढ
ऑक्टोबर महिन्यात 13 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या काळात पेट्रोल 3.85 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटरमागे 4.35 रुपयांनी महाग झाले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर्स प्रतिबॅरल इतके होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.