जामनेर प्रतिनिधी | जामनेर ते बोदवड रस्त्यावरील वाडी फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात वाडी येथील रहिवासी व एस. टी. महामंडळाचे निवृत्त कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यु झाला. तर सोबत असलेला मालदाभाडी येथील वृद्ध अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
वाडी येथील रहिवासी भागवत लक्ष्मण पाटील हे आपल्या दुचाकीने वाडी येथून जामनेर, बोदवड रस्त्यावरील वाडी फाट्यावर आले होते. त्यांच्यासोबत मालदाभाडी येथील बाळू कडू काकडे हे ही होते. हे दोघे दुचाकीवरून जात असताना वाडी फाट्यावर अज्ञात ट्रकने पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भागवत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाळू काकडे यांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले. मालदाभाडी व वाडी या दोन गावांमधील अंतर सुमारे ७ किलोमीटर आहे. विशेष म्हणजे हे दोघे कधी एकत्र नसतात. मात्र, आज हे दोघे एका दुचाकीवर कसे आले, असा प्रश्न उपस्थितांना पडला. तर पाटील हे कोरोना काळात एस. टी. महामंडळातून चालक म्हणून निवृत्त झाले. त्यावेळी निवृत्तीनिमित्त राहून गेलेला स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाची त्यांनी तयारी चालवली होती. त्यासाठी मुली, मुले, नातवंडे असे सर्व वाडी या त्यांच्या गावी जमले होते. मात्र, कार्यक्रमापूर्वीच पाटील यांचे अपघाती निधन झाल्याने उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.