लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये रविवारी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीने चिरडले असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, त्यासंबंधी एक व्हिडीओ आता व्हायरल होतोय. त्यामध्ये एक SUV गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसते आणि त्यांना तशीच चिरडत पुढे निघून जाते असं दिसतंय. हा व्हिडीओ लखीमपूर खेरी या ठिकाणचा असल्याचं सांगण्यात येतंय.
जवळपास 25 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलक शेतकरी सरकार विरोधी घोषणाबाजी करत रस्त्यावरून चालले आहेत आणि मागून अचानक एक SUV कार येते आणि त्यांना चिरडून तशीच पुढे निघून जाते. पण हा व्हिडीओ लखीमपूरमधील आहे की नाही याची सत्यता उत्तर प्रदेश पोलिसांनी अद्याप तपासली नाही.
ही SUV केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील होती. या SUV मध्ये मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच बसला होता असं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलंय.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. रविवारी लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.