नाशिकः पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावे पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याचा प्रकार घडला आहे. जळगावतल्या बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेप्रकरणी अटकेत असलेले सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झवंर यांना हे फोन आले आहेत. ‘तुमचे महत्वाचे काम मी करून देताे, तुम्ही माझे एक काम करून द्या, मी छगन भुजबळ यांचा पीए बाेलताेय, तर कधी मी पंकज भुजबळ बाेलताेय तर कधी जळगावचे जिल्हाधिकारी बाेलताेय, असे वारंवार फाेन करून मदतीचे आश्वासन देणाऱ्या ताेतया व्यक्तींविराेधात अंबड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनिल झंवर यांचा मुलगा सूरज झंवर याला पालकमंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करण्यात आला. तसेच, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नावाने देखील आल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यांना 9423421111 या क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने पंकज भुजबळ बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात का आला नाहीत, अशी विचारणा केली. त्यानंतर जळगाव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नावे एक फोन आला. त्या व्यक्तीने सूरज यांना तुमचे कोणते काम करायचे आहे, अशी विचारणा केली.
फोन करणाऱ्या व्यक्तीने पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावाचाही वापर केला. सूरज यांनी मित्राच्या घरून संबंधितांना फोन केला. तेव्हा समोरून छगन भुजबळ बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही आमचे काम करा. तुम्हाला समीर व पंकज मदत करतील. तुमचेही एक मोठे काम करून देण्यात येईल, असा निरोप दिला. भुजबळांच्या नावे धमकीचे फोन करून पूर्वीप्रमाणेच खोडसाळपणा सुरू असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.