मुंबई: सणासुदीचा हंगाम तोंडावर असताना महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलीटर 24 पैसे तर डिझेलच्या दरात 32 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावात एका लिटरच्या पेट्रोलचा दर १०९.१५ इतका आहे. तर डिझेलचा प्रति लिटरचा भाव ९८.१७ रुपये इतका आहे.
आज मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.19 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.16 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा दर 112.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.