मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ८० डॉलर नजीक पोहोचल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा भार सामन्यांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ झाली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल दरात २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ करण्यात आली. मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे.
याआधी गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली होती. या दरवाढीनंतर भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव ११० रुपयावर गेला होता. तर बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवला होता.
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.९५ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.९५ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.५८ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.४७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.३७ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.४४ रुपये झाले आहे.
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.८४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९०.१७ रुपये आहे. चेन्नईत ९४.७४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.२७ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९९.०९ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.७० रुपये आहे.