जळगाव प्रतिनिधी – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोयासटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मू.जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मू़जे़ महाविद्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. उदर्य कुळकर्णी, डॉ.ए.आर. राणे, डॉ. युवाकुमार रेड्डी, प्रा. दिलीप हुंडीवाले आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, रविवारी कार्यक्रमाप्रसंगी अमृत महोत्सव लोगो तसेच प्रतिक चिन्हाचे अनावरण आणि केसीई ज्ञानजगत अंकाचे प्रकाशन केले जाणार आहे़ त्यासोबतच केसीईतील जेष्ठ सदस्य, सेवानिवृत्त ज्येष्ठ प्राचार्य व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत वडोदकर यांनी दिली.
हे असणार प्रमुख मान्यवर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील एनआयसीटीई येथील चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे, विद्यापीठ अनुदान आयोगचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, पुणे येथील सावित्रीबाई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे डॉ. रामा शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमात असणार आहे. तसेच अमृत महोत्सवानिमित्त वर्षभरात ७५ विविध कार्यक्रम २२ संस्थांमध्ये पार पडणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला प्रा. स.ना.भारंबे, डॉ. गौरी राणे, डॉ. देवयानी बेंडाळे, डॉ. करूणा सपकाळे, डॉ. प्रज्ञा जंगले, सुभाष तळेले, संदीप केदार, गणेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.