मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची २४ तासांहून अधिक काळ पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर उपचार घेत असताना राजवाडी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
या महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. संपूर्ण घटना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बलात्कारानंतर, आरोपीने पीडितेला अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर फरार झाले. पीडितेला एका टेम्पोमध्ये फेकण्यात आले होते. साकीनाका पोलिसांनी हा गुन्हा करणाऱ्या आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३७६ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोहन चौहान अशा नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.