केरळ : केरळमध्ये निपाह विषाणूने आढळून आल्याने टेन्शन आणखीच वाढलं आहे. आधीच देशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रात येत असताना त्यात निपाह विषाणूने केरळमध्ये दहशत पसरविली आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचा निपाह विषाणू संक्रमणानं मृत्यू झाल्यानंतर ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’द्वारे एकमेकांच्या संपर्कात आलेल्या १८८ नागरिकांची ओळख पटवण्यात आलीय.
१२ वर्षांच्या मुलाचा निपाह विषाणू संक्रमणामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रशासन अलर्ट झालंय. राज्यात करोनानंतर आता निपाहची दहशत पसरलेली दिसून येतेय. सोबतच, शेजारील इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
स्थानिक अधिकाऱ्यांकडून शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तयारी सुरू केलीय. विषाणू संक्रमण फैलावण्याचा धोका ओळखून कोझिकोडमध्ये एक विशेष निपाह वॉर्डची तातडीनं स्थापना करण्यात आलीय. मंत्रिमंडळ आणि आरोग्य तज्ज्ञांसोबत बैठकीनंतर पुढील रणनीती आखण्यात येईल, असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय.
दरम्यान, निपाह विषाणू संक्रमित मृताच्या संपर्कात आलेल्या १८८ नागरिकांची कॉन्टक्ट ट्रेसिंगद्वारे ओळख पटवण्यात आलीय. तर तब्बल १६८ जणांना आपापल्या घरातच आयसोलेट करण्यात आलंय.
यातील २० जणांना ‘अति धोक्याच्या’ शक्यतेमुळे रुग्णालयामुळे दाखल करण्यात आलंय. यातील दोन रुग्णांत निपाहची लक्षणं आढळून आली आहेत. हे दोघेही आरोग्य कर्मचारी असल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलीय. यातील एक खासगी रुग्णालयात काम करतो तर दुसरा कोझिकोड तपासणी कॉलेज आणि रुग्णालयाचा कर्मचारी आहे.