चाळीसगाव : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सुरुवात झालीय. रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. त्यामुळे गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना पूर आला आहे.
या पुराच्या पाण्यात चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावातील ६३ वर्षीय वृद्ध महिला कलाबाई पांचाळ या वाहून गेल्या व त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर पिंपरखेड परिसरात नदीच्या पुरात एक अनोळखी मृतदेह सापडला आहे. तर अनेक गावांमध्ये पुरामुळे शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चाळीसगावात पहाटे नदीला अचानक पूर आल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. बहुतेक लोक झोपेतच असताना हा महापूर आला. काही गावांमध्ये लोक अडकले असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या पथकात ३५ जणांचा समावेश असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी दिली आहे.
पुराच्या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, तहसीलदार अमोल मोरे आदींसह इतर विभागाचे अधिकारी चाळीसगावात दाखल झाले आहेत. कन्नड घाटात दरड कोसळली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगड व मातीचे ढीग पडलेले आहेत. ते दूर करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पाहणी केली.