जळगाव प्रतिनिधी | पत्नीस विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस मंगळवारी न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.
दीपक रघुनाथ पाटील (रा. तळई, ता. एरंडोल) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक हा पत्नी गायत्री हिच्यासह अंतुर्ली (ता. भडगाव) येथे भीमराव बाजीराव महाजन यांच्या शेतात कामाला व रहिवासाला होता. १० एप्रिल २०१८ रोजी शेतात काम करीत असताना त्याने तहान लागली म्हणून पत्नीस पाणी मागीतले. पत्नी गायत्री ही विहिरीतून पाणी काढत असातना त्याने धक्का मारुन तिला पाण्यात फेकले. सुदैवाने गायत्री पाण्यात बुडून जात असताना तिच्या हातात वीज पंपाची वायर लागली.
यामुळे ती वाचली. पती दीपक पाटील व आप्पा रामदास महाजन यांनी विहिरीत उतरुन तिला बाहेर काढले. यानंतर काही दिवस तीच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. गायत्री गलवाडे (ता. सोयगाव, औरंगाबाद) माहेरी गेल्यानंतर तिने पती विरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने दीपक पाटील याला दोषी धरुन शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रदीप एम. महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी जावरे, कुलकर्णी यांनी मदत केली