भुसावळ प्रतिनिधी | भुसावळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनाने टोळ्यांना हद्दपार करण्याचे सत्र सुरू ठेवत आता आणखी एकाला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. नुकतेच ८ जणांना हद्दपार केले असता त्या पाठोपाठ तालुक्यातील वराडसीम येथील सचिन संतोष सपकाळे याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
वराडसीम येथील सचिन सपकाळे याच्या हद्दपारीचा प्रस्ताव ४ जानेवारी २०२१ रोजी प्रांत कार्यालयात दाखल करण्यात आला होता. प्रांत सुलाणे यांनी पोलिस प्रशासनासह सचिन सपकाळे याचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर सचिनला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, प्रांताचे आदेश भुसावळ तालुका पोलिसांकडे देण्यात आले असून ते सपकाळेला तातडीने हे आदेश बजावणार आहेत. यानंतर त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात येणार आहे.
दरम्यान,शहरातील सुमारे १०० उपद्रवी व गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी त्यांची कुंडली जमा करण्यात आली असून या पैकी पहिल्या टप्प्यात ५५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहे. पुन्हा ४५ प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.