जळगाव : जळगावात शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेतील 5 भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता आणखी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात पुन्हा भाजपला धक्का बसला आहे.
नुकताच मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या 6 विद्यमान भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या ३ नगरसेवकांना सेनेने गळाला लावले आहे. भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे एकूण 57 नगरसेवक होते. त्यापैकी एकूण 30 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता आणखी 11 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.
57 नगरसेवकांसह भाजपकडे बहुमत होते. मात्र, आता 30 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच आणखी 11 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास भाजपकडे आता केवळ 16 नगरसेवक शिल्लक राहतील.