जळगाव,(प्रतिनिधी)- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्या सहकार्याने चेतनदास मेहता रूग्णालय, सिंधी काॅलनी, जळगाव येथे रविवार, दि. 9 मे, 2021 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पत्रकारांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहेत.
दरम्यान पत्रकारांना लसीकरण करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे केली होती.
तरी जिल्ह्यातील सर्व अधिस्वीकृतीधारक पत्रकार, सर्व दैनिकांच्या संपादकीय विभागात कार्यरत असलेले श्रमिक पत्रकार (संपादक, कार्यकारी संपादक, सह संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर आदि) सर्व इलेक्ट्रॉनिक्स चॅनलचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, शासनमान्य यादीवरील साप्ताहिकांचे संपादक) यांनी आपले आधारकार्ड व दैनिक, साप्ताहिक व चॅनलचे ओळखपत्र घेऊन आज शनिवार दि. 8 मे, रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत तर 9 मे रोजी सकाळी 10..00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एका दैनिकातील एकाच व्यक्तीने इतर सहका-यांचे कागदपत्र घेऊन कार्यालयात यावे.युट्यूब व वेब पोर्टल चॅनल प्रतिनिधींनी त्यांचे पोस्ट ऑफिस अथवा उद्योग विभागाकडील नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र व आधारकार्ड आणणे आवश्यक आहेत.
पालकमंत्री, प्रशासनाचे आभार – प्रविण सपकाळे
कोरोना काळात पत्रकारांनी फ्रंट लाईन वर राहून काम केले आहे, आजही जीवाची पर्वा न करता पत्रकारितेत सेवा बजावत आहे अशा पत्रकार बांधवांचे लसीकरण करण्याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहानभूती पूर्वक विचार करून लसीकरण शिबिराचे आयोजन केले त्याबाबत पत्रकार संघाच्या वतीने मी आपले व आपल्या प्रशासनाचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी दिली आहे.