जामनेर – तालुक्यातील युवक आणि त्याच्या आजच्या समस्या नवीन नाहीत, युवकांना एकत्र आणून युवाशक्तीच्या माध्यमातून युवकांसहित समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी “युवा संघर्ष ग्रुप” ची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केले.


यासाठी केली गृपची स्थापना…
तालुक्यातील बेरोजगारी,व्यसनाधीनता, शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना येणाऱ्या अडचणी, सामान्य कुटुंबातून आल्याकारणाने समाजात होणारी कुचंबणा. ह्या समस्या वर्षानुवर्षे जामनेरचा युवा सहन करतोय. किंबहुना त्याच्यावर त्या लादल्या जात आहेत. आपल्या समस्या काय, गरजा काय यापासून अनभिज्ञ असणारा हा युवक वर्ग एकत्रित आणणे ज्याप्रकारे गरजेचे होते त्यापेक्षा ते कितीतरी पटीने कठीण होते. ह्या युवकांना एकत्रित आणून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व इतर अडचणी सोडवू शकणारं असं स्टेज त्याला लाभणे आवश्यक होतं.
राजकीय पक्षाच्या बॅनरखाली कुठलंही संघटन न करता समाजाच्या सर्वच घटकांपर्यंत पोहचण्यासाठी एका सामाजिक व सेवाभावी संस्थेची जशी आवश्यकता असते अगदी त्याच प्रकारे हा व्यवस्थेने नाकारलेला युवक आज जामनेर तालुक्याचे युवा नेते अभिषेक पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष ग्रुपच्या नावाखाली एकटवण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात जाऊन आधी या युवकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा विश्वास निर्माण करून आज अखेर जामनेरात युवा संघर्ष ग्रुपची स्थापना करण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून फुले,शाहू, आंबेडकर चळवळीचे अभ्यासक व व्याख्याते प्रा.आधारजी पानपाटील हे लाभलेले होते. शिवपूजन केल्यानंतर ग्रुपच्या अधिकृत बॅनरचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या जलप्रलयात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षपदी अभिषेकभाऊ पाटील यांची एकमुखाने निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अभिषेक पाटील यांनी आपल्या प्रास्तविकात ग्रुपची ध्येयधोरणे, सामाजिक व राजकीय निकड म्हणून आपल्या म्हणण्याला न्याय मिळावा म्हणून व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आपल्याला स्थान मिळावं म्हणून युवकांच्या पाठीशी हा ग्रुप सदैव असणार असल्याचं मत मांडलं. तालुक्यातील युवकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे आजची भीषण बेरोजगारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांना या बेरोजगारीचं उत्तर द्यावं लागेल व तरुणांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी लवकरच रस्त्यावर उतरण्याचाही इशारा त्यांनी दिला. युवा संघटन करणे जिकिरीचे असते. एक जण कुठलीही क्रांती करू शकत नाही,समान ध्येय असणारी समविचारी माणसे जोपर्यंत एका छताखाली येत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्या आणि गरजा पूर्ण होऊ शकत नाही, किंवा प्रस्थापित लोक त्याविषयी गंभीर होत नाही. म्हणून सर्वात अगोदर युवक शक्ती एकत्र येण्याचीही आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं. आज ह्या ग्रुपच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील युवक जो मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्षे वंचित आहे त्या तरुणांच्या न्याय,हक्कासाठी हा ग्रुप सदैव कार्यरत असेल अशी ग्वाहीही त्यांनी आपल्या भाषणात मांडली. शिवाय कुठल्याही राजकीय फायद्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ग्रुपची निर्मितीही केली नसल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. समारोपात रोज सकाळी आईला सांगून घराबाहेर निघत चला की, आलो तर तुझा, नाहीतर छत्रपतींचा..! या वाक्याने नवा जोश उपस्थित तरुणांमध्ये जागला.
तत्पूर्वी, मार्गदर्शनपर व्याख्यानात पानपाटील यांनी या ग्रुपची गरज आणि त्यातून केली जाणारी सामाजिक कार्ये याविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं. आजचा युवक केवळ सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवून स्वतःचा मेंदू वापरायला तयार नाही किंवा त्याला तसाच खितपत ठेवण्यात व्यवस्थेचाही हात असल्याचं त्यांनी म्हटलं. युवा संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून अभिषेकभाऊ ज्या पद्धतीने युवासंघटन करत आहेत ते कौतुकास्पद आहे व ज्यापद्धतीने प्रस्थापित वर्गाशी आपल्या अधिकारांसाठी लढत आहेत त्याविषयी अभिनंदनही केलं.
यांची होती प्रमुख उपस्थिती…
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव चव्हाण, जामनेरचे भूमिपुत्र “बबल्या ईकस केसावर फुगे” फेम गायक अण्णा सुरवाडे,जितूभाऊ पाटील, रवीभाऊ बंडे, दीपक राजपूत, राजू भोई,मोहन चौधरी,विवेक वाघ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या असण्याने या कार्यक्रमाची शोभा वाढली ते ग्रुपचे सदस्य व हितचिंतकांच्या उपस्थितीने हा क्षण ऐतिहासिक झाला. यावेळी ग्रुप सभासद नोंदणीही करण्यात आली. टप्प्याटप्प्याने ती पूर्णही केली जाईल. बिगरराजकीय व्यासपीठ म्हणून युवकवर्गाचा या ग्रुपच्या माध्यमातून एल्गाराची सुरुवात असणारा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय ही आनंदाची बाब आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रुपचे प्रमुख आधारस्तंभ किशोर खोडपे यांनी केले.
















