सांगली :- सतत सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीत सध्या भीषण परिस्थिती आहे. सांगलीमध्ये पुरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट पलटली असून १४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीमधील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या ३० नागरिकांना बाहेर काढत असताना बोट पलटी झाली. बोट पलटी झाल्याने १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत.
पावसाचे थैमान; कोल्हापूर, सांगलीत महापुराची तीव्रता वाढली; २७ बळी, दीड लाख बेघर
मुसळधार पाऊस आणि पात्राबाहेर वाहणा-या नद्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर शहर-जिल्ह्य़ांची अवस्था गुरुवारी आणखी भीषण झाली आहे. हजारो बुडालेली घरे, पाण्याखाली गेलेले रस्ते-बाजारपेठा, ठप्प झालेले जनजीवन आणि मदतीसाठी सुरू असलेली विविध यंत्रणांची धडपड.. हेच विदारक चित्र या दोन्ही शहर- जिल्ह्य़ांमध्ये दिसत आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांत आतापर्यंत २७ जणांचा बळी गेला आहे. पूरस्थितीमुळे बेघर झालेल्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर, सातारा परिसरात अजूनही मुसळधार सुरू असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती वर्तविली जात आहे.