ठाणे,(चेतन महाजन): ठाण्यातील बायोसेंस कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. ठाणे महागनरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत घटनास्थळावरुन जे फोटोज समोर आले आहेत ते पाहून ही आग किती भीषण आहे याचा अंदाज वर्तवला जावू शकतो.
कंपनीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. कंपनीचा तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर ही आग पसरली आहे.
सायंकाळी ४.३० ते ५ वाजण्याच्या सुमारास ही आगलागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश मस्के यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, बायोसेंस कंपनीला आग लागली असून कंपनीत कोणताही कर्मचारी अडकलेला नाहीये. शॉर्ट सर्किटमुळे ही आग
लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रात असलेल्या प्रशांत स्वीट कॉर्नरच्या गोडाऊन जवळ बायोसेंस ही कंपनी आहे. आग लागली असल्याची
माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे जवान, ठाणे
मनपा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, वागळे इस्टेट पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले आहेत.