जळगाव, ता. 9: जळगाव जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु झालेली असून सर्वसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. श्रीराम मंदीर निधी समर्पण अभियानानिमित्त मातृशक्ती तर्फे रविवार, दि. 10 जानेवारी रोजी शहरातील विविध वस्तीत महिलांनी ‘‘राम जन्मला गं सखे राम जन्मला.. ते कुश लव रामायण गाती…’’ अशा रामायणातील विविध प्रसंग रेखाटणारी व अशा प्रसंगांवर आधारित रांगोळी काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे समितीकडून कळविण्यात आले आहे. रांगोळी काढतेवेळी मास्क व शारिरिक अंतर राखूनच रांगोळी काढावी. रांगोळी ही मंदीर, मैदान, गल्ली अशा ठिकाणी काढावी. रांगोळी काढतांना चार ते पाच महिलांनी समूहाने सहभागी व्हावे. रांगोळीत ‘#लोकाभिराम, श्रीराम मंदीर निधी समर्पण अभियान’ असे अवश्य लिहावे व सोशल मिडीयावर रांगोळीचे फोटो शेअर करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
तसेच जळगाव शहर श्रीराम मंदीर निधी संकलन अभियानांतर्गत सचिन मुसळे सर यांच्याद्वारे मार्गदर्शित ‘श्रीराममंदीर दीपोत्सव’ याचे आयोजन दि. 10 जानेवारी रोजी सायं. 5 ते 7 या वेळेत करण्यात आले आहे. दीपोत्सव ला.ना.शाळेच्या मुख्य पटांगणावर साकार होणार असून शहरातील 501 बाल रामभक्त 5001 दिवे लावून 15 तासात दिव्यांनी साकारलेले भव्य राम मंदीर तयार करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणूनन आर्किटेक्ट संदीप सिकची यांची उपस्थिती लाभणार आहे. सहभाग घेणार्या बाल रामभक्तांनी 5 मातीचे दिवे, 10 वात व त्या अनुरुप तेल हे साहित्य दीपोत्सवाच्या ठिकाणी सोबत आणावयाचे आहे. हे भव्य व विलोभनीय असे दिव्यांच्या रोशणाईने तेजोमयी राम मंदिर साकारण्यासाठी व अनुभवण्यासाठी पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन ही श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे करण्यात आले आहे.