जळगाव, (प्रतिनिधी) – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील आरोग्य कर्मचारी मिलींद काळे यांनी आज सकाळी सर्वप्रथम कोरोनाची लस घेतली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची लस घेणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. मिलिंद काळे हे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आहेत.
आज सकाळी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या लसीच्या सुरू झालेल्या ‘ड्राय रन’ मध्ये मिलिंद काळे यांना सर्वात पहिल्यांदा लस देण्यात आली आहे. कोविडची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून कुणीही न घाबरता लस घेण्याचे आवाहन मिलींद काळे यांनी यावेळी केले. मिलिंद काळे यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती आहे.