जळगाव (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील युवतीच्या सामूहिक बलात्कार व जीवे ठार मारल्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळा पूर्वीच आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून प्रकरण गंभीर आहे मात्र उपाययोजना काहीच नसल्याने दिवसेंदिवस अत्याचाराची प्रकरणे वाढत असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे घटना..
पारोळा तालुक्यातील शहरात 20 वर्षीय युवतीचे अपहरण करून तिला कासोदा येथे नेत तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जबरदस्ती विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जबर जखमी असलेल्या तरुणीला बसस्थानकाच्या मागे फेकून नराधमांनी क्रूर कृत्य केले. उपचारादरम्यान मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी अखेर मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

या घटने प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं की, “जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका युवतीवर बलात्कार आणि नंतर विष देऊन झालेली हत्येची घटना अतिशय गंभीर आहे. राज्यात महिला अत्याचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. पण, कुठेही त्यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत, या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी.जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून त्या नराधमांना शिक्षा व्हावी.नसत्या गोष्टींत वेळ घालवायचा आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, असे करून चालणार नाही. माझी विनंती आहे,महिला सुरक्षेला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.














