कोरोना अर्थात कोव्हीड १९ ह्या संसर्गजन्य महामारीने आपल्या आयुष्यात व नेहमीच्या जीवनशैलीत बरेच बदल घडवून आणलेत !
कोरोनाचा सामना करतानांच आपल्या शब्दकोशात वेगळ्याच अश्या अनेक शब्दांची भर पडली !
लॉकडाऊन , आयसोलेशन , क्वारनटाईन , ट्रेसिंग ,हॉटस्पॉट , कंटेनमेन्ट झोन ,स्वाब टेस्ट , अँटीजेन टेस्ट अश्या शब्दांबरोबरच नुकतेच एक नवीन शब्द ग्रामीण भागातही प्रचलित होत आहे तो म्हणजे एचआरसीटी !
कोरोनासाठी करण्यात येणारी ” एच .आर.सी.टी चेस्ट “हि एक अत्याधुनिक अशी रेडिओलॉजिकल चाचणी असून सध्या कोरोनाचा सामना करतांना ह्या चाचणीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात मोठया प्रमाणात केला जात आहे.
एचआरसीटी चेस्ट म्हणजे नेमके काय ?
हि चाचणी नेमकी कधी करायची ?
ह्या चाचणीची उपयुक्तता काय ?
स्वाब टेस्ट पेक्षा हि चाचणी फायदेशीर आहे का ?
ह्या चाचणीसाठी घेण्यात येणाऱ्या फी बद्दल काय मते – मतांतरे आहेत ?
ह्या सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख !
एचआरसीटी चेस्ट म्हणजे हाय रिसोल्युशन कॉम्पुटेटेड टोमोग्राफी ऑफ चेस्ट ! अर्थात छातीच्या सिटीस्कॅन चा एक प्रकार !
छातीच्या सिटीस्कॅन चे तीन प्रकार असतात !
NCCT – कॉन्ट्रास्ट न वापरता केलेला स्कॅन !
CECT – कॉण्ट्रास्ट वापरून केलेला स्कॅन !
HRCT – उच्च दर्जाची प्रतिमा देणारा स्कॅन !
एचआरसिटी चेस्ट ह्या चाचणीत क्ष किरणे व संगणकीय प्रणालीचा वापर करून छातीच्या आत असलेले विविध अवयव खास करून फुफ्फुस ,ह्रदय व हाडे व इतर पेशींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या , विविध कोनातून अनेक प्रतिमा घेतल्या जातात !
ह्या प्रतिमा नेहमीच्या X-ray पेक्षा जास्त परिणामकारक व अचूक , विस्तृत स्वरूपाची माहिती त्या अवयवांच्या आजारांबाबत किंवा जखमांबाबत देत असतात .
सिटीस्कॅन मध्ये क्ष किरणांचा प्रवाह हा छातीभोवती गोलाकार पद्धतीने प्रचंड गतीने फिरून , वेगवेगळ्या प्रतिमांचे कट ( स्लाईस ) तयार करून त्या एकत्रित करून त्यांच्यावर संगणकाच्या माध्यमातून प्रोसेसिंग करून मॉनिटर वर अवलोकन करून तपासणी अहवाल हा प्रशिक्षित डॉक्टरांकडून केला जातो !
प्रत्यक्षात स्कॅनसाठी लागणारा कालावधी हा काही मिनिटांचाच असतो पण तपासणी अहवालास मात्र वेळ लागतो !
एचआरसीटी चेस्ट हि चाचणी कोरोनाच्या निदानासाठी उपयुक्त आहे का ?
कोरोनाच्या निदानासाठी प्रचलित असलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट व आर टी पीसीआर स्वाब टेस्ट ह्यांच्या काही मर्यादा आहेत ! ह्या दोन्ही टेस्ट पॉसिटीव्ह असल्या तर पेशंट हा कोरोना पॉसिटीव्हच असतो पण जर टेस्ट निगेटिव्ह आली तरी अनुक्रमे ४० व ३० टक्के पेशंट मध्ये ती चुकीची राहू शकते म्हणजे पेशण्ट हा कोरोनाग्रस्त असतो पण टेस्ट निगेटिव्ह येते !
ह्या उलट जर लक्षणे जाणवल्यानंतर तिसऱ्या किंवा चवथ्या दिवशी एचआरसिटी चेस्ट ह्या चाचणीला सामोरे गेल्यास ९० ते ९५ टक्के पेशन्ट मध्ये ते जर कोरोनाने प्रभावित असतील तर कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते !
म्हणजे एचआरसीटी चेस्ट हि कोरोनासाठी अचूक निदान करणारी चाचणी आहे हे सिद्ध होत आहे व अनेक अभ्यासात हे पडताळून पाहिलेले आहे !
पण हे लक्षात घेतले पाहिजे की सामुदायिक स्तरावर , भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात , विकसिनशील देशात हि महागडी चाचणी कोरोनाच्या निदानासाठी वापरणे हितकारक नाही आहे !त्याचप्रमाणे ह्या टेस्ट ला सामोरे जातांना गर्भवती स्त्रीया व लहान मुले ह्यांना सर्वसाधारणपणे वगळलेले हिताचे असते कारण क्ष किरण उत्सर्जनाचा धोका !
क्ष किरण उत्सर्जनाचा धोका सगळ्यांनाच असला तरी सध्यस्थितीत असलेल्या प्रगत व आधुनिक सिटीस्कॅन मशीनमुळे हा धोका एखाददुसऱ्या परीक्षणामुळे संभावित नाही !
कधी करावी एचआरसीटी चेस्टची तपासणी ?
(१) प्रत्येक कोरोनासंशयित रुग्णाला हि चाचणी करायची गरज नाही !
लक्षणे विरहित रुग्णाना योगायोगाने किंवा अपघाताने एचआरसीटी ला सामोरे जावे लागले तर अश्या बहुसंख्य रुग्णांना त्यात कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे तरीही कोरोनाचे निदान करण्यासाठी
लक्षणेविरहित रुग्णांना एच आरसीटी ची गरज नाहीच नाही !
(२) सद्यस्थितीत ज्या संशयित रुग्णाची स्वाब टेस्ट किंवा अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आहे पण रुग्णास ताप , खोकला व श्वसनास त्रास होत असेल अश्या रुग्णाने एचआरसीटी टेस्ट केल्यास व त्यात कोरोनाचे निदान झाल्यास पुढील उपचारासाठी फार फायदेशीर ठरते !
(३) ज्या ठिकाणी लगेच स्वाब टेस्ट ची सुविधा उपलब्ध होत नसेल , तपासणी अहवालास फार विलंब होत असेल व ह्या दरम्यान त्रास जास्त वाढल्यास एचआरसीटी टेस्ट चा पर्यायाचा जरूर अवलंब केला गेला पाहिजे !
(४) कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णास जर ६ मिनिट चालल्यावर धाप लागत असेल , दम लागत असेल व प्राणवायूचे प्रमाण कमी होत असेल तर अश्या रुग्णाच्या फुफ्फुसात कोरोनाचे संक्रमण झाले का हे पाहण्यासाठी एचआरसीटी चेस्ट हि चाचणी महत्वाची ठरते !
(५) कोरोनाग्रस्त रुग्णास जर हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागत असेल तर त्यापूर्वी एचआरसीटी चेस्ट चाचणी केल्यास आजाराची पुढची प्रोग्रेस , त्याचा पुढील प्रवास कसा राहू शकतो , गुंतागुंत होऊ शकते का? आक्रमक उपचाराची गरज पडू शकते का ?ह्याचा अंदाज उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ह्या चाचणीच्या अहवालाद्वारे करता येऊ शकतो !
(६) कोरोनाच्या महामारीत जर एखाद्या व्यक्तीस सतत येणाऱ्या तापाचे कारण उलगडत नसेल व उपचारास अडथळा येत असेल तर एचआरसीटी करून कोरोनाची शंका पडताळून पाहिली पाहिजे !
(७) अतिजोखमीच्या रूग्णामध्ये जर अतिगंभीर कोरोना होण्याची शक्यता पूर्वीपासूनच असेल तर एचआरसीटी केल्यास उपचारासाठी फायदा होतो !
कोरोनाच्या निदानात एचआरसीटी मुळे का येते अचूकता ?
कोरोनाची लागण जर फुफ्फुसापर्यंत पोहोचली तर एचआरसीटी चेस्ट मध्ये आजारी फुफ्फुसात विशेष असे फिक्या व ग्रे रंगाचे पट्टे दिसून येतात ज्यास ग्राउंड ग्लास ऑपॅसिटी असे म्हणतात कारण हे पट्टे पारदर्शक असतात अर्थात ह्या पट्ट्यांच्या मागे असलेला फुफ्फुसाचा उरलेला भाग , रक्तवाहिनी , सूक्ष्म श्वासनलिका ह्यात स्पष्टपणे दिसतात ! ह्या स्पेसिफिक अश्या ग्राउंड ग्लॉस ऑपॅसिटी फक्त कोरोनामध्येच दिसतात असे नाही परंतु कोरोना ह्या वैश्विक महामारीत , सद्यस्थितीत सर्वप्रथम कोरोनाचाच विचार करावा लागतो !
एच आर सिटी चेस्ट ह्या चाचणीची उपयुक्तता बहुअंगी आहे !
कोरोना आहे कि नाही आहे ह्याची शक्यता हि चाचणी पडताळून पाहते त्याचबरोबर फुफ्फुसाचा किती भाग कोरोनाने ग्रासलेला आहे त्याचा हि ” स्कोअर ” हि चाचणी सांगते !
व महत्वाचे म्हणजे हि चाचणी फार फास्ट होते !
एचआरसीटी चेस्ट च्या दराबाबत काय आहेत मत -मतांतरे ?
एचआरसीटी चेस्ट हि तपासणी महागडी आहे कारण सिटीस्कॅन मशीनच्या कोटींच्या घरातील किमती , त्यांच्या देखभालीचा लाखोंचा खर्च , शासनाने लादलेला भरमसाठ कर , व्यावसायिक दराने भरावे लागणारे वीज बिल , स्थानिक करातील वाढ , कर्जाचे हप्ते , व प्रशिक्षित डॉक्टर्स व टेक्निशयन ह्यांचे वेतन व एकंदरीत आस्थापनावर असलेला खर्च ह्याचा ताळमेळ घालून हे सिटीस्कॅन सेंटर कार्यरत असतात ! व जे दर पूर्वीपासून आकारले जात होते त्यात कुठलीही वाढ न करता खाजगी सेंटर ह्या कोरोनाच्या काळात अत्यंत विपरीत परिस्थितीत सुविधा पुरवीत असतांना
महाराष्ट् शासनाने एचआरसीटी चेस्ट च्या दराबाबतीत घेतलेला नियंत्रणाचा निर्णय अव्यवहार्य व डॉक्टरांवर अन्याय करणारा आहे !
लोकहिताच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांसाठी कमी दरात हि सुविधा उपलब्ध होत असेल तर ते उत्तमच आहे पण ह्याचा आर्थिक बोजा स्वतः च्या हिमतीवर खाजगी आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांवर पडणार आहे !
शासन मात्र ह्यात कुठलीही सवलत ह्या महागड्या मशीन खरेदीवेळी किंवा नंतर देण्यास तयार नसून शासकीय रुग्णालयात हि सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत आहे !
एचआरसीटी चेस्ट च्या दराबाबतीत मते- मतांतरे आहेत पण एचआरसीटीचेस्ट ह्या चाचणीबाबत मात्र वैद्यकीय क्षेत्रात व प्रशासनात एकमत आहे ते असे कि एचआरसीटी चेस्ट हि कोरोनाच्या उपचारासाठी एक बहुमूल्य व बहुअंगी अशी उपयुक्त चाचणी आहे !
सर्वसामान्य नागरिकांमध्ये व ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये एचआरसीटीचेस्ट बाबतीत जागरूकता व जागृती ह्यावी ह्या हेतूने हा लेखप्रपंच !
डॉ . गीतांजली ठाकूर
कन्सल्टन्ट रेडिओलॉजिस्ट
” सुखकर्ता फाउंडेशन “
एरंडोल / जळगाव !
संपर्कसूत्र : ९८६००८०६६०
उपयुक्त माहिती आहे धन्यवाद, पण बरे झल्यावर corona टेस्ट आणि HRCT परत घ्यायची का? आणि यामुळे इतर अवयवांवर काही दुष्परिणाम होतात का ते जनतेला समजले पाहिजे तरच लोक काळजी घेतील आणि मास्क, सेनिटाइज़र, अंतर ठेवून रहातील.