पाचोरा – येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षा केंद्राची तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती केंद्र संचालक डॉ.विजय पाटील यांनी दिली आहे.
येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथमच नीट (NEET)परीक्षा केंद्र देण्यात आलेले असून तारीख १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत दरम्यान होणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण ३६० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवरील अत्यावश्यक तपासणी व रजिस्ट्रेशन यासाठी परीक्षार्थी उमेदवारांना सकाळी११ वाजेपासून शालेय आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. नोएडा येथील एन. टी. ए. या संस्थेतर्फे संपूर्ण भारतात ही परीक्षा घेण्यात येते. कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काटेकोर उपाययोजना म्हणून शिंदे इंटरनॅशनल ची संपूर्ण इमारत निर्जंतुक करण्यात आलेली आहे. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान घेण्यात येणार आहे. एकूण ३० ब्लॉक या इमारतीत असून प्रत्येक ब्लॉकमध्ये फक्त १२ विद्यार्थी व दोन पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्यक्ष परीक्षा संचलनाचे सर्व नियम व त्या अनुषंगाने परीक्षा संचलनाची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक डॉ. विजय पाटील यांनी परीक्षा संचलनाचे काटेकोर नियोजन केलेले आहे.















