- विवेकानंद विद्यालयात जलसंरक्षण अभियान निमित्त प्रदर्शन सुरू
जळगाव दि. १८ : मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आपल्याला थकवा येतो, विविध आजार जडतात. मानवासह इतर प्राण्यांसाठीदेखील पाणी उपयुक्त आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करतानाच पाणी आरोग्यवर्धक कसे होईल, याकडे सुद्धा लक्ष दिले गेले पाहिजे. पाणी जपून वापरले तरच ते येणाऱ्या पिढीला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, त्यामुळेआजपासुन पाणी बचतीचा मंत्र सर्वांनीच स्वीकारण्याची गरज असल्याचे मत डॉ. दीपक पाटील यांनी मांडले.
विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंरक्षण अभियाना’निमित्त पोस्टर्स प्रदर्शन भरविण्यात आले. पोस्टर प्रदर्शनाच्या उदघाटनानंतर डॉ. पाटील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, डॉ. दीपक पाटील, जैन इरिगेशनचे दिनेश दीक्षित, आनंद पाटील उपस्थित होते. सरस्वती पुजनाने सुरवात करण्यात आली.
यावेळी डॉ. दीपक पाटील यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याची उपयोगिता, पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, जगभरात पिण्याच्या पाण्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजे केवळ एक टक्का इतकेच आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा असे सांगून डॉ. पाटील यांनी निरोगी राहण्यासाठी दिवसभरात किती पाणी प्यावे, कोणत्यावेळी प्यावे, महिलांनी-पुरुषांनी किती पाणी प्यावे याबाबत मार्गदर्शन केले.
जलसंरक्षण अभियानामध्ये पाणी बचतीवर प्रबोधनात्मक असे 60 पोस्टर्स विद्यालयाच्या हॉलमध्येलावण्यात आले. यामध्ये पाण्याविषयी महापुरूषांचे विचार, पाणीबचतीसाठी करावयाचे प्रयत्न असे प्रबोधनात्मक विषयावर पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. प्रास्ताविकातून दिनेश दीक्षित यांनी अभियानामागची भूमिका मांडली. संतोष चौधरी यांनी सुत्रसंचालन केले. पाणी बचतीबाबत शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. विद्यालयाचे गणेश लोखंडे, दत्तात्रेय गंधे, मुकूंद शिरसाठ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.