चाळीसगाव – मागील काळात घडलेल्या काही प्रकरणांमुळे जळगाव चे नाव देशात खराब झाले आहे पण मला अभिमान वाटतो की आपण चाळीसगाव मध्ये आतापर्यंत कोरोना नियंत्रणात यश मिळवले ते सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे. कोविड सेंटर हे भीतीचे नाही तर विश्वासाचे केंद्र झाले पाहिजे तरच पेशंट स्वताहून पुढे येतील. आतापर्यंत लॉकडाऊन असल्याने कोरोना बाबत आपल्याला उपाययोजना करणे सोपे जात होते मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. गंभीर प्रकरणे ज्यामुळे चाळीसगाव चे नाव खराब होईल असे प्रकरण शक्यतो घडता कामा नयेत याची दक्षता घ्यावी. नाहीतर आतापर्यंत केलेली सर्व मेहनत वाया जाईल. प्रशासकीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणीबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी जळगाव येथील बैठकीत लक्ष वेधणार आहे. तसेच आमदार निधीतून भविष्यकाळातील गरज लक्षात घेत डिजिटल एक्सरे मशीन, अत्याधुनिक रुग्णवाहिका व कोविड सेंटर ला पिण्याच्या पाण्याचा प्यूरीफायर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले. चाळीसगाव तालुक्यात वाढत असणाऱ्या कोरोणा रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यालयात आयोजित केलेल्या प्रशासकीय विभागांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मिकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, पं.स. चे गटविकास अधिकारी अतुल पाटील, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता शेंडगे साहेब, चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, शहर पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड, मेहुणबारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, यांच्यासह पंचायत समिती व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी आमदार मंगेश चव्हाण यांनी विविध विषयांवर चर्चा करून कोरोना संदर्भातील उपाययोजना बाबत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. सोमवारी जळगाव येथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडील बैठकीत याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. चाळीसगाव येथे सद्यस्थितीत १ कोविड सेंटर, १ क्वारंटाईन सेंटर, १ संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर असे एकूण 3 सेंटर सुरु आहेत.
क्वारंटाईन सेंटर मध्ये पाणी, जेवण, बेडशीट, आदींसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
स्वँब अहवाल उशिरा मिळत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. आज रोजी तालुक्यातील ६७ अहवाल येणे बाकी आहे.
आरोग्य विभागात १५ ते २० कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कंत्राटी स्वरूपात त्यांची भरती करण्याची विनंती करण्यात येईल. तसेच शहर पोलिसांवर पडणारा भार लक्षात घेत अजून १० होमगार्ड व शहर पो.स्टे.ला महिला कर्मचारी उपलब्ध करून देणेबाबत पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा करण्यात येईल. कोरोना रुग्णांवर चाळीसगाव येथेच उपचारासाठी खाजगी डॉक्टरांची मदत घेतली जाईल, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी नगरपालिका प्रशासनाला सूचना केली की क्वारंटाइन सेंटर येथील ओला व सुका कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिका तर्फे स्वतंत्र घंटागाडीचे नियोजन करण्यात यावे.
पं.स.गटविकास अधिकारी यांनी सांगितले की ग्रामपंचायत मार्फत रुग्णांची तपासणी साठी थर्मामीटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
जनता कर्फ्युचा निर्णय सर्वांशी चर्चा करून
बैठकीत जनता कर्फ्युबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. जी दुकाने व संस्था सोशल डीस्टनसिंग चे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
दीर्घकाळ लॉकडाऊन मुळे आता कुठे व्यवहार व जनजीवन पूर्वपदावर येत आहे त्यामुळे जनता कर्फ्यूचा निर्णय व्यापारी असोसिएशन व सामाजिक संघटना यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, तोपर्यंत दुकाने ५ वाजेच्या आत बंद झाली पाहिजेत याची काळजी घेण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या.
त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी शहरातील कोविड सेंटर, क्वारंटाइन सेंटर व कंटेन्मेंट झोनची पाहणी करून तेथील उपाययोजनांची माहिती घेतली.
त्यावेळी भाजपा नगरसेवक तथा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, बापू अहिरे,नगरसेवक रामचंद्र भाऊ जाधव सरचिटणीस जितेंद्र वाघ, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, जगदीश चौधरी,सदानंद भाऊ चौधरी, अमोल चौधरी आदी उपस्थित होते.–