निझामाबादः- तेलंगणाच्या निजामाबादमधील भाजप खासदार अरविंद धर्मपुरी यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ओवेसी सध्या नागरिकत्व कायद्यावरून राष्ट्रद्रोहीसारखे कृत्य करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवायला हवे, असे अरविंद धर्मपुरी म्हणाले.
धर्मपुरी म्हणाले, असदुद्दीन ओवेसी म्हणतात की, सीएए हे जातीयवादी आणि असंविधानिक आहे. तर ते या ठिकाणी सभा घेऊ शकत नाही. कारण, तेलंगाना पालिका निवडणूक असल्याने निझामाबाद मध्ये कोड ऑफ कंडक्ट लागू आहे. मी यासंबंधी जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग आणि पोलिसांना पत्र लिहिले आहे. ओवेसी देशाचे विभाजन करायला निघाले आहे. ओवेसी कोणासाठी लढत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान हून आलेल्या लोकांसाठी ओवेसी लढाई लढत आहेत का, ते सध्या देशद्रोहीसारखे वागत आहेत. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, तसेच त्यांची रवानगी जेलमध्ये व्हायला हवी, असे धर्मपुरी म्हणाले.