मुंबई – गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडं सरकारनं लक्ष द्यावं, अशी मागणी होत असताना रायगडावर नियमबाह्य पद्धतीनं बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी याबाबत तीव्र नाराजी दर्शवली आहे. पुरातत्व विभागाची ही मनमानी अशीच सुरू राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
रायगडावर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी संभाजेराजे नुकतेच तिथं गेले होते. त्यावेळी तिथं ‘रोप वे’चं काम सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. हे काम नियम धाब्यावर बसवून व परवानगी न घेता सुरू असल्याचंही त्यांना कळलं. त्यामुळं संतापलेल्या संभाजीराजे यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रायगडच्या संवर्धनासाठी विकास प्राधिकरण काम करतं. गडकिल्ल्यावर भ्रमंतीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सोयीसुविधा देण्यासाठी किंवा संवर्धनाच्या कामासाठी काही करायचं झाल्यास पुरातत्व खात्याकडून सातत्यानं आडकाठी केली जाते. नियमांवर बोट ठेवून कामांना स्थगिती दिली जाते. मग ‘रोप वे’साठी रायगड विकास प्राधिकरणाला न विचारता परवानगी दिलीच कशी गेली? अशा बेकायदा कामांना चाप लावण्यासाठी संबंधितांवर गुन्हे का दाखल केले गेले नाही,’ अशी विचारणा संभाजीराजेंनी केली आहे.