मुंबई – पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्यात भरडलेल्या लाखो ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या घोटाळ्यात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लवकरच लिलाव केला जाण्याची शक्यता आहे. लिलावासाठी जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्य निश्चित करण्याकरिता बँकेने व्हॅल्यूअर नेमणुकीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आज आर्थिक गुन्हे शाखेने ३२ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. पोलिसांकडून दाखल केल्या जाणाऱ्या चार्जशीटमध्ये कंपनीचे संचालक सारंग वाधवा, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग,माजी संचालक सुरजीत सिंग अरोरा यांना आरोपी बनवण्यात आले आहे. दरम्यान, विविध तपास यंत्रणांनी चौकशी दरम्यान जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय बँक प्रशासकाकडून घेण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये विमान आणि याॅटचा, आलिशान मोटारी यांचा समावेश आहे.