पाचोरा,(प्रतिनिधी): तालुक्यातील पिंपळगाव हरे.येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक महिण्यापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय अखेर थांबली असून जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी रुग्णालयाला दोन एमबीबीएस डॉक्टर्सची नियुक्ती केली आहे.
पावसाळा सुरु असल्याने साथीचे आजार वाढले असून, त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी होत होती. अखेरीस पिंपळगाव हरे. येथील ग्रामीण रुग्णालयाला डॉ. गोपाल जंगले व डॉ. अंजली पाटील या दोन एमबीबीएस डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.पिंपळगाव हरे. येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील २० ते २५ गावांचा आरोग्याचा कारभार चालतो. याच ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून गोरगरीब रुग्णांना डॉक्टरांसाठी भटकंती करावी लागत होती. नेहमी डॉक्टर नसल्याने रुग्णांना बाहेरून उपचार घ्यावे लागत होते.
या ग्रामीण रुग्णालयात गावातील गोरगरीब रुग्ण दररोज येतात. मात्र, डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर योग्य तो उपचार होत नव्हता आणि रुग्णांना निराश होऊन परत जावे लागत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याकडे याबाबत सामाजिक कार्यकर्ते नीलेश उबाळे यांनी मागणी केली असता त्यांनी मागणी मान्य करून दोन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.