- केशवस्मृती सेवा संस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँक लि. तर्फे आयोजन
13 एप्रिल रोजी नवव्या डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण - दिलासा, विज्ञान आश्रम, रामचंद्र प्रतिष्ठान या संस्था ठरल्या मानकरी
जळगाव, 2 एप्रिल 2024 :येथील केशवस्मृती सेवा संस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँक लि. तर्फे9 व्या डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण शनिवार, 13 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता महाबळ रोडवरील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. यावर्षी यवतमाळ येथील दिलासा संस्था, पुणे पाबळ येथील विज्ञान आश्रम व मुंबई दादर येथील रामचंद्र प्रतिष्ठान यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष्ा डॉ. भरतदादा अमळकर व जळगाव जनता बँकचे अध्यक्ष्ा सतिष मदाने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
केशवस्मृती सेवा संस्था प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी संस्थापक अध्यक्ष्ा स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कार देण्यात येत असतो. या पुरस्काराचे हे 9 वे वर्ष आहे. सेवा तसेच सामाजिक क्ष्ोत्रातील विविध घटकांच्या उत्थानाचे कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. हिच पंरपरा कायम ठेवत या वर्षाच्या पुरस्कार वितरण सोहळा 13 एप्रिल रोजी आयोजित केला आहे.
असे आहे पुरस्काराचे स्वरूप
डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कारात स्मृती चिन्ह, मानपत्र व 1 लाख रूपये असे स्वरूप आहे.
पुरस्कारप्राप्त संस्थांचा व त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय असा :
विज्ञान आश्रम, पुणे पाबळ
पुणे पाबळ येथे स्व. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांनी या आश्रमाची स्थापना केली. डॉ. कलबाग हे एमटेक असून त्यांनी शिकागो येथील ‘युनिर्व्हसिटी ऑफ युलीमॉम’ मधून पीएच.डी. पूर्ण केली. ग्रामिण जीवनाचा त्यांच्यावर खुप प्रभाव असल्याने त्यांनी आपल्या शिक्ष्ाणाचा उपयोग ग्रामिण भागातील युवक, शेतकरी यांच्या प्रगतीसाठी करण्याचे ठरविले. म्हैसुर येथे फुड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये नोकरी केली. नंतर हिंदुस्थान लिव्हर रिसर्च सेंटर येथे संशोधक म्हणून काम केले. तेथे अनेक पेटटस् त्यांच्या नावावर जमा झालेत. नंतर सेवानिवृत्ती घेवून समाजकार्यात झोकून दिले. शालेय विद्यार्थ्याची कामगीरी , त्यांना अवगत असलेली कौशल्य आणि प्रत्यक्ष्ा शालेय शिक्ष्ाण यात विसंगती असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांचे मित्र व्ही.जी. कुलकर्णी यांनी डॉ. कलबाग यांची पुण्याच्या ‘इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ एज्यूकेशन ‘ या संस्थेच्या चित्रा नाईक आणि जे.पी. नाईक यांची भेट करून दिली. ते पुण्याच्या ग्रामिण भागातील शाळांमध्ये काही प्रयोग करत होते. त्यातील एक गाव होते पाबळ. डॉ. कलबाग यांनी पाबळ गावाची निवड केली. 1983 मध्ये डॉ. कलबाग यांनी प्रत्यक्ष्ाात कामास सुरवात केली. विज्ञान आश्रम या नावाने पाबळला प्रयोगशाळा सुरू केली. बैलगाडी दुरुस्ती, वेल्डिंगची जुजबी कामे, इत्यादी कामासाठी गावातील लोक येऊ लागले. त्यांच्या उपयोगाचे तंत्रज्ञान त्यांना जवळून बघता आले त्यांनी ते स्वतः करण्याची मुभा तिथे होती. यातील पुढचं पाऊल म्हणजे आठवी नंतर शाळेतून बाहेर पडलेल्या, शाळा शिकत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार देणारा व जगवण्याचा हेतू शिकवणारा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला. अभ्यासक्रमाच्या निमित्ताने पशुपालन, शेती, शिवणकाम, वेल्डिंग शिकवायला सुरुवात केली. विज्ञान आश्रम या नावाने पाबळला प्रयोगशाळा सुरू झाली. या प्रयोगशाळेत नापास होणाऱ्या व शाळा सोडलेल्या मुलांना. शिक्षण देण्याची नियोजन करण्यात आले. शिक्षणाच्या मदतीने ग्राम विकास हा शिक्षणाचा मुख्य उद्देश होता. ग्रामीण तंत्रज्ञान विकसित केल्यास गावाचा विकास होईल, गावाची प्रगती होईल, त्यावर आधारित ‘डिप्लोमा इन बेसिक रुलर टेक्नॉलॉजी ‘ हा एक वर्षाचा ग्रामीण तंत्रज्ञान पदविका निवासी अभ्यासक्रम ग्रामीण भागातील शाळा सोडलेल्या मुलांसाठी सुरू केला. शालेय विद्यार्थ्यांसाठी इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी हा एक अभ्यासक्रम सुरू केला. वैज्ञानिक वृत्ती जोपासावी, तंत्रसाक्षरता वाढावी हा मुख्य उद्देश होता. ग्रामीण भागात उपयुक्त असे तंत्रज्ञान, सुतारकाम, गवंडी काम, वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, फॅब्रिकेशन याचप्रमाणे शेतीविषयक कामे यांचा समावेश करण्यात आला. कोर्स पूर्ण करून पाबळ गावच्या विद्यार्थ्यांनी वाहनावर बॉडी बनण्यासारखे छोटे छोटे उद्योग सुरू केलेले आहेत. बॉडी बनवायचे उद्योग या भागात प्रसिद्ध झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपले स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत.
2003 मध्ये डॉक्टर कलबाग यांचे निधन झाल्यानंतर डॉ. योगेश कुलकर्णी यांनी कार्यवाह म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. शाळांमध्ये आयबीटी कोर्स सुरू करण्यासाठी त्यांचा देखील देशासह अनेक राज्यात प्रवास सुरू असतो. विज्ञान आश्रमाची पक्क ीधारणा आहे की ग्रामीण तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी समाजातून इतर संस्थाही तयार व्हाव्यात, विज्ञान आश्रमातील विद्यार्थ्यांना साधी जीवनशैली आत्मसात करून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाची संधी निर्माण केली जात आहे . जळगाव जिल्ह्यातील पद्मश्री तथा मॅगसेस पुरस्कार विजेती नीलिमा मिश्रा यांनी डॉ. कलबाग यांच्याकडून प्रेरणा घेऊन बचत गटाच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील महिलांना रोजगार मिळवून दिला आहे .आता डॉ. योगेश कुलकर्णी हे विज्ञान आश्रमाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
मुंबई येथील रामचंद्र प्रतिष्ठान बंदीवानांमधील माणूस घडविण्यासाठी कार्यशील आहे. एखाद्या गुन्ह्यात शिक्षा सुनावल्यानंतर ज्यावेळी कारागृहात जाण्याचा क्षण येतो. त्यावेळी कठोर व्यक्ती देखील मानसिक दृष्ट्या कोसळून जाते. आपले पुढील आयुष्य हे अंधकारमय आहे. हीच भावना त्यांच्या मनाला पोखरत जातेे त्यांच्यातील आत्तापर्यंत सदगुणांना त्या एका क्षणात नष्ट होतात. कारागृहातून बाहेर पडल्यानंतरही समाजाचा बदललेल्या दृष्टिकोन, अवहेलना आणि बहिष्कृतच्या भीतीमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास गमावला जातो. त्यामुळे पुन्हा त्याला गुन्ह्याकडे वळणे भाग पाडले जाते. पर्यायाने हे मनुष्यबळ योग्य क्षणी उपयोगात आले नाही तर समाजाचेही काही प्रमाणात नुकसान होत असते. म्हणूनच कारागृहात असलेल्या बंदीवांनाचे मानसिक पुनर्वसन करून त्यांच्यात आत्मविश्वास स्वाभिमान निर्माण करण्याबरोबर राष्ट्रभक्तीची भावना अधिक प्रखर केली पाहिजे या विचारातून रामचंद्र प्रतिष्ठान या मुंबई येथील संस्थेने महाराष्ट्रातील सर्व कारागृहांमधील बंदीवानांमध्ये देशभक्ती वृंध्दींगत करण्याचा ध्यास घेतला आहे. संस्थेचे प्रमुख अशोक शिंदे आणि संचालिका नयना शिंदे या दोघांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये केली तीन वर्ष राबविला जात आहे . 27 हजाराहून अधिक पुरूष व महिला यांनी विविध उपक्रमात भाग घेतली आहे.
दिलासा संस्था यवतमाळ
वाढत्या गुणवत्तेसह अन्न, पाणी, उपजीविका आणि उत्पन्नाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी असुरक्षित आणि वंचित समुदायांसाठी शाश्वत आणि न्याय्य जीवन आधार हे ध्येय घेवून ‘दिलासा’ ही संस्था 1994 मध्ये यवतमाळमध्ये स्थापन झालेली एक खासगी स्वयंसेवी संस्था आहे. दिलासा विदर्भ आणि मराठवाडा भागातील 25 इतर लहान स्वयंसेवी संस्थांसोबत काम करते. ती शेतकरी समर्थन केंद्र चालवते, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती प्रसारित करते. सध्या महाराष्ट्र राज्यातील 845 गावांतील 59000 लाभार्थ्यांपर्यंत दिलासा पोहोचला आहे. आंध्र प्रदेश राज्यातील एकूण सेवांचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे.
“व्यक्ती, गट, समुदाय आणि इतर संस्थांना शाश्वत आधारावर कल्याण वाढविण्यासाठी एकात्मिक परिसंस्थेचा विकास करण्यासाठी प्रेरित, उत्साही आणि सक्षम करणारे वचनबद्ध विकास समर्थन प्रदान करणे हे मिशन ठेवून दिलासा संस्था काम करत आहे.
संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी शाश्वत जीवनमान निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे. कोरडवाहू स्थितीत पीक उत्पादकता वाढवणे केवळ अशक्य आहे आणि पावसाळ्यात कोरडे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी संरक्षणात्मक सिंचन आवश्यक आहे. हंगामी सिंचनाची सुविधा विशेषत: कोरड्या पाण्याचे अंतर भरून काढल्याने पिकांचे अस्तित्व निश्चितच शक्य होईल आणि शेतकरी वाढण्यास सक्षम होतील. सर्व शेतकऱ्यांची एकूण आर्थिक परिस्थिती सुधारण्यास महाराष्ट्रातील 14 संकटग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत करत आहे.