कोल्हापूर- शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात सत्ता आणेल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिला होता का? असा शब्द बाळासाहेबांना दिला असता तर त्यांनी हा शब्द खपवून घेतला नसता, असं सांगतानाच मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही केवळ औपचारिकता असून या कर्जमाफीने शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना तर या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही, असं सांगतानाच विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.