मुंबई – राज्यसरकारने केलेल्या कर्जमाफीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना भरपाई देण्याची या सरकारने घोषणा केली नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही दिलेली नाही. ठाकरे सरकार इतर कुठला कारखाना काढणार की नाही माहीत नाही. पण या सरकारने पहिल्या दिवसापासूनच चुना लावायचा कारखाना सुरू केला आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
निलेश राणे यांनी एक ट्विट करून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या सरकारकडून अधिवेशन काळात भरपूर अपेक्षा होत्या. अतिवृष्टीमुळे नुकसान सोसावं लागलेल्या शेतकऱ्यांना हे सरकार भरपाई देईल असं वाटत होतं. पण या सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना एक पैसाही दिला नाही. मुख्यमंत्री सत्तेबाहेर असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची वारंवार मागणी करायचे. पहिल्या अधिवेशनात ते सरकसकट कर्जमाफी देतील असे वाटत होते. पण त्यांनी सरसकट कर्जमाफी न देऊन शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या २ लाखांच्या कर्जमाफीमध्येही कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.