पाचोरा — येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शाळेच्या सभागृहात गिरणाई संस्थेचे चेअरमन तात्यासाहेब पंडित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले हे होते .कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे संचालक एड. जे डी काटकर, युवा नेते अमोल शिंदे, प्राचार्य डॉ.विजय पाटील हे होते.
या कार्यक्रमात बोलताना प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या व विशेष प्राविण्य असलेल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी त्यांचे करिअर गुणांवर न ठरवता आपल्यातील क्षमता ओळखून करिअर ठरवावे त्याचवेळी जिद्द चिकाटी आणि समर्पण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात आपले ध्येय गाठू शकतो असे मार्गदर्शनही त्यांनी केले.प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी इयत्ता दहावी व बारावीनंतर करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले. जेईई, नीट, इंजिनीअरिंग सीईटी, फार्मसी सीईटी, हॉटेल मॅनेजमेंट, वाणिज्य शाखेतील करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतातून तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे? हे ध्येय निश्चित करावे व त्याच्या प्राप्तीसाठी अथक परिश्रम करून यशस्वी व्हावे. ऍड जे.डी. काटकर यांनी महत्वाकांक्षा असेल तर आहे त्या परिस्थितीतही ध्येय प्राप्ती करून यशस्वी होता येते” अशा आशयाचे प्रतिपादन केले.
प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी आपल्या मनोगतातुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवावी, व्यसनांपासून दूर रहावे, कितीही मोठ्या पदावर गेलो तरी आई -वडील, गुरुजन व समाज यांच्या प्रती आपुलकी ,आदरभाव व सुसंवाद ठेवावा अशा अपेक्षा व्यक्त केला. याप्रसंगी इयत्ता दहावितील संस्कृती पाटील, योगिता पाटील, पलक झवर, स्मीत संघवी, आयुष संघवी, हिमांशू देवरे, वैदेही झवर, शांभवी शिंदे व सौम्या देशपांडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमातील सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. अक्षदा अल्केश झवर या विद्यार्थ्यीनीने केले . या कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते