नंदुरबार – भारतीय अन्न महामंडळाचा हाताळणी व वाहतुकीचा ठेका बंद करावा या कारणावरून एकास मारहाण केल्याच्या आरोपावरून अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह सहा जणांविरुद्ध नंदुरबार तालुका – पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, वाहतूक व्यावसायिक दिनेश संजय चौधरी (३०, रा. धुळे) यांना ठेक्याच्या वादातून भारतीय अन्न महामंडळाच्या चौपाळे शिवारातील गोडाऊनजवळ गाठून सात जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मोबाइलमध्ये शूटिंग केल्याने ते नष्ट करण्यासाठी मोबाइल फोडला. त्यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी (५२), विक्रांत दिलीप मोरे (४४), विशाल मोहन नवले (४०), किरण मनोहरसिंग रघुवंशी (३८), जनक केवलचंद जैन (३५), गौरव प्रकाश चौधरी (३४), प्रशांत चौधरी (४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.