भुसावळ – शहरातील एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रेमी युगलाने आत्महत्या करीत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दिनांक ३ फेब्रुवारी रोजी घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली दरम्यान प्रेमीयुगलांच्या आत्महत्येने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव ( वय २३) याचे काजल गौतम सपकाळे ( वय २० ) या तरूणीवर प्रेम होते. या दोघांनी एकमेकांच्या सोबतीने राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाह करणार होते.
काल म्हणजे शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केला. तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले.
दरम्यान, काजलच्या निधनाची वार्ता येताच कुणाल मनोज भालेराव याने थेट तापी नदीचा पुल गाठून तेथून खाली उडी मारत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. संसारवेल बहरण्यापूर्वीच या तरूण युगलाचा करूण अंत झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.